NRI आणि वडापाव

एक NRI.. वर्षानुवर्षं बाहेर राहिलेला. मनाने तरीही भारतातच रमणारा. जगणं कोणाला कुठे आणि कसं नेईल सांगता येतं का? असाच प्रवाहाबरोबर वहात आलेला तो… भारतात मिळणाऱ्या पदार्थांची चव अजून जिभेवर जपून ठेवणारा.. मधून मधून परदेशातल्या भारतीय हॉटेल मध्ये त्याच नावाच्या पदार्थांच्या फसवणुकीवर समाधान मानून घेणारा…
 
त्याच्या जिभेचे मनसुबे त्याला परत परत भारतात घेऊन येतात. २० वर्षांपूर्वीचं आयुष्य परत एक महिना जगायचं हाच प्रत्येक ट्रिपचा उद्देश.. मग कोपर्यावरचा वडा पाववाला, पुढे गेलं की सामोसा, कुठे पाव भाजी तर कुठे कबाब तर कुठे भेळपुरी.. सर्व सर्व हवं असतं पण सर्व एका वेळी खाता मात्र येत नसतं, कारण हे शरीर आता या सर्वाची सवय घालवून बसलेलं असतं.
 
पण तरीही तो जातो.. हट्टाने दत्त स्नॅक्सच्या दारांत उभा रहातो.. त्या वासाने इतके दिवस धरून ठेवलेला संयम तुटायला लागतो आणि काहीही विचार नं करता लगेच दोन वडा पावची ऑर्डर जाते. “साहेब यात कांदा घालू का?”, “हे नवीन बघा की try करुन”.. हे काही काही नको असतं. फक्त पूर्वीसारखा गरमागरम कुरकुरीत कंगोरे आलेला झणझणीत वडा, आत एक ओली आणि एक लाल सुकी चटणी आणि तोच तो लादीचा पाव, सर्व एका कळकट जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं मिळतं… आणि या एवढ्याशा ५ रुपयांच्या जामानिम्यानें त्याच्या पाऊण लाख रुपयांच्या तिकिटाचं सार्थक होतं.
 
त्या वर्तमानपत्राची ती पुडी उघडताना होणारी घालमेल, आत असलेली ती लाल चटणी अजून त्या पावात भरतानाचं समाधान, सर्वांनाच नाही कळणार. त्या क्षणी तो कुठल्याही देशात जायला तयार नसतो. फक्त तो वडा पाव आणि तो, एवढंच जग असतं, एवढंच आयुष्याचं सार असतं, एवढंच ध्येय असतं आणि एवढीच कमाई असते. परत जाताना हाच वडा पाव त्याच्या जिभेवर रेंगाळत रहातो.. त्याची जागा कुठलाही बर्गर घेऊ शकत नाही.. त्या वर्तमानपत्राच्या पुडीपुढे कुठल्याच चकचकीत प्लेट्स आणि काटे चमचे टिकत नाहीत… त्याची किंमत खरं तर पाऊण लाख आणि पाच रुपये असते.. पण ती परत परत मोजायला तो तयार असतो आणि पुढच्या ट्रीपचा बेत आखत  असतो ………
 
[sgmb id=1]
This entry was posted in Life, Posts. Bookmark the permalink.

One Response to NRI आणि वडापाव

  1. Sudesh says:

    अगदी खरं। तोंडाला पाणी सुटलं। आज घरी वडा पावच चहा बरोबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *